सीतामढी – देशात कोरोनाविरुद्ध लढाईत लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व आहे. जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. निर्धारीत वेळेत सर्व लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत.
बिहारमध्ये लसीकरण केंद्रावर हिंसक घटना झाल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी झालेल्या गोंधळात अनेक लोकं जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वत:चा जीव मुठीत घालून पळून गेले. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर दोन गटामध्ये हाणामारी झाली. कोरोनाची लस पहिली कोण घेणार? यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहचला की लसीकरण केंद्रावरच एकमेकांशी भिडले.
माहितीनुसार, भटोलिया गावातील शाळेत मंगळवारी कोरोना लसीवरून दोन गटात मारहाणीची घटना घडली. यात १२ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. स्थानिक पोलिसांना याची माहिती समजताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सशस्त्र पोलीस दलही पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या प्रयत्नानंतर लसीकरण केंद्रावरील तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. गावात सध्या शांतता आहे मात्र पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले. त्यात काही गंभीर असल्याचंही समोर आलं आहे.
या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिले मला, पहिले मला करत दोन गटात वाद सुरू झाला. त्यानंतर काही जणांनी हाणामारीला सुरुवात केली. ज्यात काही लोक जखमी झाले आहेत. स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. बखरी आणि भटोलिया गावात सशस्त्र पोलीस दल तैनात केले आहे. यापूर्वी देशातील काही भागात अशाप्रकारे घटना घडली होती. कोरोना लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत होते. त्यात प्रचंड गदारोळ झाला होता.
तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी
देशात १३२ दिवसांनंतर प्रथमच नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे, तर १२४ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्ण चार लाखांच्या आत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ३,९८,१०० असून, एकूण रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.२७ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के आहे.
देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण आढळले, तर ४१५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,२१,३८२ झाली आहे.२४ तासांत नव्या रुग्णांची संख्या १३,०८९ ने कमी झाली, तर एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूदर हा १.३४ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.१९ कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ३,१४,४०,९५१ रुग्ण आहेत. सोमवारी १७,२०,११० कोविड चाचण्या घेतल्या गेल्या व या बरोबर आतापर्यंत ४५,९१,६४,१२१ चाचण्या केल्या गेल्या. रुग्ण सकारात्मक निघण्याचा दैनिक दर १.७३ टक्के तर साप्ताहिक दर २.३३ टक्के आहे.