सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद सुरु आहे. यासाठी ते एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजू दास परमहंस यांच्यासोबत वाक् युद्ध सुरु झाले, ते पार मारहाणीपर्यंत गेल्याचा प्रकार घडला आहे.
वादादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याने राजू दास परमहंस संतापले. या कारणावरून दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू झाली. काही वेळातच वातावरण अधिक तापले आणि हाणामारीही झाली. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. यामुळे ते मौर्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.
दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ताज हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमातून बाहेर पडताना हनुमानगढी, अयोध्येचे महंत राजू दास आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. करोडो लोक रामचरित मानस वाचत नाहीत, हा सगळा मूर्खपणा आहे. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले होते, असे मौर्य म्हणाले होते. रामचरित मानसमधील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. ब्राह्मण हा लंपट, दुष्ट, अशिक्षित आणि अशिक्षित असू शकतो, पण जर तो ब्राह्मण असेल तर तो पूज्य आहे असे म्हटले जाते. परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याचा आदर करू नका हा धर्म आहे का? असा सवाल केला होता. यावरून मौर्य यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.