कल्याण - कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावित असताना तीन पोलिसांना रस्त्यावर गर्दी झाल्याचे दिसून आले. या तिघांही पोलिसांनी गर्दी पाहून त्याठिकाणी धाव घेतली असता एक जण चाकूने दोन जणांवर हल्ला करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराच्या तावडीतून दोन जणांना वाचविले आहे.
हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे. तर त्या दोन्ही जखमी तरुणांना खाजगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे.कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस प्रवीण देवरे, उत्तम खरात आणि कुणाल परदेशी हे काटेमानिवली नाका ते चिचंपाडा रोडवर कर्तव्य बजावित होते. या भागात ज्या दुकानदारांनी सीसीटीव्ही लावले नाही. त्यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी हे पोलिस दुकानदारांना भेटून आवाहन करीत होते. या पोलिसांना ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सोपविली होती. कर्तव्य बजावित असताना काटेमानेवली ते चिंचपाडा रोडवर एक गर्दी दिसून आली. त्यावेळी या तिन्ही पोलिसांनी त्यादिशेने धाव घेतली. तेव्हा गर्दीत एक इसम हा हात चाकू घेऊन दो जणांवर हल्ला करीत असल्याचे दिसून आले.
हा प्रकार पाहून जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफीने ज्याच्या हाती चाकू होता त्याला जमीनीवर पाडून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्याला अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव मयूर रामदास दराडे असून तो हनुमान नगरात राहणारा आहे. तर ज्या तरुणांना त्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. त्या तरुणांची नावे विशाल पाटील आणि दिपेश रसाळ अशी आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन तरुणांचा जीव वाचविणा:या पोलिसांचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कौतूक केले आहे.