- हेमंत बावकरमुंबई-पुणे दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्विनसारख्या ट्रेनमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनारक्षित तिकिटे किंवा विनातिकीट प्रवाशांची भाईगिरी सुरु झाली आहे. बुधवारी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि गुरुवारी मुंबईहून सायंकाळी पुण्याला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये जोरदार झोंबाझोंबी, मारामारी झाली. यामुळे रिझर्व्हेशन करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धास्ती वाटू लागली आहे.
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यांसोबत जनरलचे डबेही पुरेसे आहेत. तरीही हे अनारक्षित तिकिटे असलेले प्रवासी आरक्षणाच्या डब्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. यावेळी ट्रेनमध्ये चढताना या प्रवाशांमध्ये झोंबाझोंबी होते, आत आल्यावर एकमेकांना अश्लिल शिवीगाळ करण्यापासून ते मारामारी करण्यापर्यंत मजल जात आहे.
बुधवारी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाला पन्नाशीतील व्यक्तीने गाडीत चढताना धक्का मारला. यामुळे त्या तरुणाच्या खांद्याला मुका मार लागला. यावरून त्या तरुणाने जाब विचारल्याने त्या व्यक्तीने तरुणाला अंगावर जाऊन मारायलाच सुरुवात केली. या धक्काबुक्कीमुळे सीटवर बसलेल्या प्रवाशांवर ते पडले. या डब्यांमध्ये अनेकदा टीसीदेखील तिकीटे तपासायला फिरकत नाहीत. रेल्वे पोलीस तर पुढच्या स्टेशनवर नजर टाकली तरी दिसत नाहीत. यामुळे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास आणि भितीच्या छायेखाली प्रवास करावा लागत आहे.
गुरुवारी देखील आरक्षित डब्यामध्ये असाच प्रकार घडला. एक पंचवीशीतील तरुण आणि चाळीशीतील ब़ॉडीबिल्डर असे दोघे एकमेकांना भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मारामारी केली. यामुळे डब्यातील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. या दोन्ही प्रकारांची कुठलीही पोलीस तक्रार झाली नाही.
घुसखोर नित्याचेच...मुंबई-पुणे येता जाता आरक्षित डब्यांमध्ये घुसखोर नित्याचेच झाले आहेत. सीएसटी, दादरवरून हे घुसखोर आरक्षित डब्यांतून अरेरावी करत कर्जतपर्यंत प्रवास करत असतात. आरक्षण असल्याचे सांगितले तरी ते तिकीट दाखवा म्हणत सीटवरून उठण्याचे नाव घेत नाहीत. सिंहगड एक्स्प्रेसमधून आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना दररोजच या कटकटीला सामोरे जावे लागत आहे. अशातच प्रवाशांच्या बॅगा, वस्तू चोरी होण्याचीही शक्यता आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा घुसखोर लोकलच्या पासधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.