मुंबई - कारागृह पोलिस भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या नांदेडमधील दोन उमेदवारांविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांच्या पायातील चीप बदली करत निवड प्रक्रियेत फायदा होण्याच्या हेतूने लबाडी केल्याचे समोर आले आहे.
घाटकोपर पूर्व येथील लोहमार्ग मुख्यालयात कारागृह पोलिस भरती बंदोबस्तावरील सपोनि आशिष कार्ले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १२ सप्टेंबरला कारागृह पोलिस भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावणे मैदानी चाचणी प्रक्रियेत सहायक प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात होती. यामध्ये उमेदवार राम गुंटेवाड आणि श्रीधर पल्लेवाड या दोघांनी ही चाचणी पूर्ण केली. टेक्निशियन आशुतोष मौर्य यांनी नेट टाईमची पाहणी केली असता दोघांच्या धावण्याच्या वेळेत आणि रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांसह टेक्निशियन विभागात जाऊन १६०० मीटर धावणे चाचणीचे सर्व लॅप रिपोर्ट काढून तपासणी केली. त्यामध्ये गुंटेवाडचा नेट टाईम ४.४५.३०० आणि उमेदवार श्रीधर पल्लेवाड याचा नेट टाईम ४.४४.९०० असा दिसला. प्रत्यक्षात उमेदवार केवळ दोनच लॅप धावले होते. रेकॉर्डवरील टाईम आणि लॅप व उमेदवारांनी धावलेले लॅप यात मोठी तफावत दिसत होती. यावरून दोन्ही उमेदवारांनी आपसात संगनमत करून एकमेकांच्या पायातील चीप बदली करत निवड प्रक्रियेत फायदा होण्याच्या हेतूने लबाडी करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे.