धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 07:25 PM2021-01-15T19:25:10+5:302021-01-15T19:36:09+5:30

Petition Against Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे.

File a case against Dhananjay Munde, petition in the High Court | धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

googlenewsNext
ठळक मुद्देयाचिका पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडे यांनी त्यांना दोन मुली असल्याचे नमूद केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी समाजमाध्यमाद्वारे स्पष्ट केले की, ते त्यांच्या पत्नीव्यतिरिक्त आणखी एका महिलेशी २००३ पासून संबंध आहेत. त्या महिलेपासून त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा व मुलगी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंडे यांनी हेतुपूर्वक ही बाब लपवली.  आयपीसी ४२० अंतर्गत त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गतही गुन्हा केला आहे. ही बाब उघडकीस आल्यावर मी परळी (बीड जिल्हा) येथील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. पोलीस महा संचालक व मुख्य निवडणूक आयुक्तांनीही मी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल केली आहे, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

निवडणूक अर्जात खोटी माहिती दिल्याबद्दल मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्या. तसेच मी केलेल्या तक्रारीवरून चौकशी व तपास करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

Web Title: File a case against Dhananjay Munde, petition in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.