बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपरिषद लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे खंडणी मागणाऱ्या चार जणांविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांवर ही खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर नगरपालिकेत लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेले विश्वास जामघरे यांनी करोना काळात अनेक कामे नगरपालिकेची केली होती. ही कामे करत असताना त्यात काही त्रुटी असल्याचे आरोप करत अविनाश सोनवणे, अमोल सोनवणे, विशाल गायकवाड, संजय कदम त्यांनी जामघरे यांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून मीटिंग घेऊन त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात विश्वास जमघरे यांनी थेट ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे जाऊन तक्रार दाखल केली.
या चौघांनी पंचवीस लाखांपासून ते आठ लाख रुपयांपर्यंत तडजोड करण्याचा प्रयत्न केला. बदलापूर नगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठेकेदाराकडे खंडणी मागणार्यांना वर गुन्हा दाखल झाल्याने बदलापूर शहरात खळबळ उडाली आहे. खंडणी विरोधी पथक ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट नाळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.