मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण आणि त्यातील युनियनबाजीला आवरण्याची मागणी होत आहे. सेटवर जाऊन कोणाला त्रास दिल्यास मनसे स्टाईल कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. तर, सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर व मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी केली आहे.
फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजू सापते यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यापुढे निर्माता, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेटवर जाऊन त्रास दिलात तर हात-पाय तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी सोशल मीडियातील पोस्टद्वारे दिला. कोणत्याही युनियनला सेटवर जाण्याचा, काम थांबवायचा अधिकार नाही. न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.
कीर्तिकर यांचे पत्रखासदार गजानन कीर्तिकर यांनी पोलिसांना पत्र पाठवून राकेश मौर्या व साथीदारांवर कारवाईची मागणी केली. फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनच्या विद्यमान कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या जाचाबद्दल पोलिसांना विस्तृत निवेदन दिले होते. राकेश मौर्या याच्या दादागिरीबाबत वारंवार तक्रार दाखल केली असतानाही पोलिसांकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे सापते यांच्यावर आत्महत्येची वेळ ओढवली, असे कीर्तिकर यांनी पत्रात म्हटले.