नाशिक- नाशिक शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रूग्णालयात व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर बदनामी केल्या प्रकरणी नाशिक पोलीसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा कहर असून त्यानंतर रूग्णालयांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरचा पुरवठा होत नाही. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकरोड येथील महापालिकेच्या नवीन बिटको रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच त्यानंतर तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत महापालिकेला काही त्रूटी दुर करण्याच्या सूचना केल्या इतकेच नव्हे तर नाशिकसाठी दाेन खासगी कंपन्यांचे गॅस टँकर मिळवण्यासाठी खासगी उद्योगांशी चर्चा करून टँकर देखील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.
मात्र, बिटको रूग्णलयात ते पाहणी करत असताना काहींनी त्यांचा व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपाचे नाशिकरोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलीसांत तक्रार केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्या प्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहूल जोशी आणि बंटी ठाकरे अशा पाच जणांच्या विरोधातअदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.