नागपूर : विधवेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण केल्यानंतर फरार झालेल्या पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या भोळेला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी निलंबित केले.पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचाही स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलासुद्धा लग्नासाठी तयार झाली. ८ नोव्हेंबर २०२० रोजी आर्वीनजीकच्या (जि. वर्धा) श्रीक्षेत्र काैंडण्यपूर येथे त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते नंदनवनमध्ये भाड्याने राहू लागले. नंतर भोळेच्या संपर्कातील महिला भेटीला येऊ लागल्याने महिलेेने चाैकशी केली असता तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. त्यामुळे तिने त्याला धारेवर धरले. भोळेचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे उघड झाल्याने या दोघांमधील वाद टोकाला गेला. महिलेने काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन भोळेच्या लीला त्यांना ऐकवल्या. ४ मार्चला ‘लोकमत’ने हे प्रकरण प्रकाशित केल्यानंतर भोळे गायब झाला. त्याने तिचा मोबाइल नंबरही ‘ब्लॉक’ केला.दरम्यान, वैफल्यग्रस्त झालेल्या महिलेने शुक्रवारी इकडे तिकडे फोन मेसेज करून आपली व्यथा ऐकवली. तिची मन:स्थिती लक्षात घेत काहींनी हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला. आयुक्तांनी लगेच गिट्टीखदान पोलिसांना भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
आजारी रजेच्या नावाखाली फरारभोळे याने कारवाईच्या भीतीपोटी आजारी रजेचा पर्याय निवडला असला तरी प्रकरणाचा बोभाटा झाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचा आदेश काढला.