मुंबई - कुख्तात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर, दानिश अली आणि दोन पाकिस्तानी नागरिकांना काही दिवसांपूर्वी अमेरिकेने शस्त्र तस्करीप्रकरणी अटक केली होती. अमेरिकेच्या या कारवाईनंतर आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून अथक प्रयत्न सुरू असताना मुंबई पोलिसांना अखेर दानिशचा ताबा मिळाला. त्यानंतर तब्बल ४ महिन्यानंतर दानिशविरोधात पोलीस आणि सीआयूच्या अधिकाऱ्यांनी पुरावे जमा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. १५० पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी ५ जणांची साक्ष नोंदवलेली आहे.
नवी दिल्लीच्या जामा मस्जिद परिसरात कुटुंबियांसोबत राहणाऱ्या दानिशची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे वडील जामा मस्जिदमध्ये काम करायचे. मात्र, वाढतं वय आणि आजारपणामुळे त्यांनी मस्जिदची नोकरी सोडून दिली. दानिशला दोन भाऊ असून मोठा भाऊ हा रशियात डाॅक्टर आहे. तर दुसरा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात वकील आहे. २००१ मध्ये दानिश नोकरीच्या शोधात दुबईला गेला होता. तेथे त्याची ओळख सोहेल कासकरसोबत झाली. २ ते ३ वर्ष दानिश सोहेलच्या संपर्कात होता. या कालावधीत सोहेल रशियातल्या डायमंड खरेदी विक्री व्यवसायाकडे आकर्षिला गेला. हा व्यवसाय केला तर चांगला फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं होतं. मात्र, रशियात तडकाफडकी या व्यवसायाची माहिती मिळणं अवघड असल्यामुळे सोहेलने २००३ आणि २००४ मध्ये स्टुडंट व्हिसावर दानिशला रशियाला पाठवलं. शिक्षणाबरोबरच दानिश हा रशियातील व्यापाऱ्यांची माहिती सोहेलला देत होता. छुप्या पद्धतीने त्याने व्यवसायही सुरू केला होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत एका डायमंड तस्करीत सोहेलला पहिल्यांदा अटक झाली. त्यातून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. नंतर दक्षिण आफ्रिकेत सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन त्यांनी शस्त्र तस्करीस सुरूवात केली. या तस्करीमुळे ते अमेरिकेच्या पोलिसांच्या रडारवर आले. मात्र, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे त्यांना पकडण्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे या दोघांना पकण्यासाठी अमेरिकेने कट रचला होता. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचंच एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचं भासवून या दोघांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाणघेवाणीची बोलणी सुरु केली. कुठला साठा हवा आहे यापासून ते त्यांच्या किंमतीपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या रेकॉर्डवर (व्हिडिओ आणि ओडिओ रेकाँर्डिंग) घेत होते. या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने सोहेल आणि दानिशसह हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल यांना स्पेनमधून २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती.