पुणे - देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका होत आहे. अभिनेत्री कंगना हिचे बेताल वक्तव्य म्हणजे बेकायदेशीर असामाजिक कृत्य असून तिच्या विरुद्ध बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत (U.A.P.A.) १९६७ तसेच कलम १५३ ब व २४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदवावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते व चित्रपट निर्माते निलेश नवलाख यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन यथे दाखल केली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केलेल्या या तक्रारीत कंगना रणौत हिचे वक्तव्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचे गंभीर प्रकरण आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१० नोव्हेंबर २०२१ या दिवशी एका वृत्त वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कंगना रणौत या बॉलीवूड अभिनेत्रीने भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य सैनिकांचा जाहीर अपमान केला. या आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलताना अभिनेत्री कंगना हिने विधान केले की “अग्रेजोसे मिली वह आझादी नही थी, वह भिक थी और आझादी २०१४ मे मिली है”. तसेच हे वक्तव्य करताना कार्यक्रमाचे आयोजक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालक यापैकी कुणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.