मुंबई/ कोल्हापूर : मालमत्ता हडपण्यासाठी मामाच्या मुलानेच फिल्मी स्टाइलने कोल्हापूरच्या रोहिणी कांबळे आणि त्यांचा मुलगा विशाल कांबळे यांचे अपहरण करत हत्येची सुपारी दिली. तर, रोहिणी यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. कांबळे कुटुंबीयांची चेंबूर आणि कोल्हापूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. याच संपत्तीसाठी त्यांचे सख्खे नातेवाईक त्यांच्यावर जिवावर उठले.
मूळच्या कोल्हापूरच्या रहिवासी असलेल्या रोहिणी यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या मुलगा विशाल सोबतच राहायच्या. विशाल वकील होता. चेंबूरच्या नीलकमल हॉटेलमधून कांबळे मायलेकाचे अपहरण करत त्यांना पनवेलच्या एका व्हिलावर नेले. तेथे विशालची हत्या करत आईला डांबून ठेवले होते. या प्रकरणात मामाचा मुलगा प्रणव रामटेकेसह पाच जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
दोन कोटींचा टुमदार बंगला ...कोल्हापुरातील आर.के.नगर येथे तीन नंबर सोसायटीत त्यांचा सुमारे पाच हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि त्यावर दुमजली टुमदार बंगला आहे. याची किंमत अंदाजे दोन कोटी रुपयांपर्यंत असेल. या मालमत्तेवर बँकेचे कर्ज आहे, त्यामुळे अडीच महिन्यांपूर्वीच बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात ही मालमत्ता सील केली. बंद बंगल्याच्या आवारात दोन चारचाकी आणि दोन दुचाकीही आहेत. याशिवाय जिल्ह्यात अन्य ठिकाणीही त्यांचे प्लॉट, जमीन असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
म्हणून आईला ठेवले होते जिवंत...मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी कागदपत्रे बनविण्यासाठी दिले होते. याच कागदपत्रांवर सह्या घेणे बाकी असल्यामुळे रोहिणी यांना जिवंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचीही हत्या करण्याचा कट आरोपींचा होता. ५ एप्रिल पासून यांना आधी राजस्थान त्यानंतर गोरेगाव परिसरात महिलेला डांबून ठेवल्याचे समजताच पथकाने तेथे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत रोहिणी यांची सुटका केली. सध्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वसंत कांबळे कोण ?विशालचे वडील वसंत कांबळे हे निवृत्त पोलिस उपायुक्त होते. २०१३ मध्ये त्यांच्या चेंबूर लाल डोंगर परिसरातील बंगल्यात झालेल्या पार्टीमुळे ते चर्चेत आले होते. ते पोलिस अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
घटनाक्रम ५ एप्रिल - रोहिणी आणि विशाल कांबळे बेपत्ता५ एप्रिल - बैठकीसाठी बोलावून विशालची पनवेल येथे हत्या२१ एप्रिल - चेंबूर पोलिसांत तक्रार२ मे - रोहिणी यांची सुखरूप सुटका