अकोला : चोरीचे सोने खरेदी केल्या प्रकरणात शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला अटक करून स्थानिक गुन्हे शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार सिटी कोतवाली पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले.
सराफा व्यवसायी श्याम धनराज वर्मा(४०) यांनी सीआरपीसी १५६(३) अंतर्गत न्यायालयात पोलिसांविरूद्ध याचिका दाखल केली होती. यात त्यांनी ९ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एकही नोटीस न देता, राहत्या घरातून मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण (आता पीएसआय), पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी उचलून नेले. कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण केली. एलसीबी कार्यालयात आणून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना नग्न करून त्यांच्यावर नैसर्गिक लैंगिक अत्याचार सुद्धा केल्याचे म्हटले आहे.
तक्रारदार श्याम वर्मा यांना जामीन मिळाल्यावर, त्यांनी १८ जानेवारीला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. परंतु त्याविरूद्ध पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल सुद्धा घेतली. त्यामुळे वर्मा यांनी डीआयजी चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या प्रकरणात तक्रारदार श्याम वर्मा यांनी सीआरपीसी १५६(३) नुसार पोलिसांविरूद्ध वकील रितेश डी. वर्मा यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेत, न्यायालयाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सिटी कोतवाली पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले.
कोणते गुन्हे केले दाखल?कोतवाली पोलिसांनी भादंवि कलम ३७७, ३५४, ३४१, ३४३, ३४८, ३५७, ३५८, ३६२, २९४, ३२४, ३२६, ३३०, ३३१, ४४७, ४५२, ३५२, २०१, ५०४, ५०९(३४) आणि १२० (ब) असे गुन्हे दाखल केले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासणारकोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आता ९ ते १८ जानेवारी २०२२ दरम्यानचे एलसीबी कार्यालयातील आणि आणि तक्रारकर्त्याच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सराफा व्यवसायिक श्याम वर्मा यांना मारहाण केल्याचे, लैंगिक छळ केल्याचे चित्रण सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद असल्याची शक्यता आहे.