अजमेर - राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीच्या जयपूर टीमने लाचप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. अजमेर येथील एएसपी दिव्या मित्तल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. एबीसीच्या पथकाने अटकेपूर्वी त्यांच्या घराची कसून तपासणी केली. त्यानंतर, लाच घेतल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. यावेळी, दिव्या मित्तल यांनी वरिष्ठांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतात, असं विधान केल्याने प्रशासनात रुजलेल्या भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
दिव्या मित्तल यांना २ कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र, ड्रग्ज माफियांना अटक केल्यानंतर बक्षीस म्हणून ही रक्कम आपल्याला मिळाली आहे. आपण, कोणाकडूनही लाच घेतली नसल्याचा दावा दिव्या यांनी केला आहे. अजमेरमध्ये ड्रग्ज माफियांचं रॅकेट असून माझ्याकडून फाईल हटविण्यात यावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, मी सातत्याने त्यांना ट्रॅक करत आहे. अजमेर पोलिसांतील काही अधिकारीही याप्रकरणात सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप दिव्या यांनी केला आहे.
एसीबीने केलेल्या चौकशीत दिव्या मित्तल यांनी वरिष्ठ अधिकारी आणि अजमेर पोलिसांकडेही बोट दाखवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाच घेतलेला पैसा द्यावा लागतो, असे विधानही त्यांच्याकडून समोर आले आहे. त्यामुळे, आता वरपर्यंत म्हणजे कोणापर्यंत पैसे पुरवला जातो, याचा तपास एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, एसीबीने दिव्या मित्तल यांच्या निवासस्थानसह अन्य ठिकाणी छापा टाकला. तत्पूर्वी एका तक्रारदाराने एसीबी कार्यालयात येऊन आपणास एका प्रकरणातून नाव हटविण्यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याप्रकरणात त्याचा कसलाही सहभाग नव्हता, असेही तो म्हणाला. दिव्या मित्तल यांनी सांगितल्याप्रमाणे एका दलालाकडून २ कोटी रुपयांची मागणी झाली. मात्र, भीती दाखवून १ कोटी रुपयांवर निश्चित ठरलं. त्यानुसार, २५ लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार होती. मात्र, दलालाला एसीबीच्या कारवाईची खबर मिळाल्याने तो पोहोचलाच नाही. अखेर, एसीबीने कोर्टातून सर्च वॉरंट घेत ही कारवाई केली.