दारव्हा (यवतमाळ) : तालुक्यातील हातोला येथे २ नोव्हेंबर रोजी अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या १२ तासात या प्रकरणाचा छडा लावला. सदर महिलेची ओळख पटली असून ती कारंजा तालुक्यातील भाडशिवनी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. प्रेमप्रकरणातून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळला गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
याप्रकरणी वाशिम जिल्ह्याच्या कारंजा येथील माळीपुरा येथे राहणारा राजू श्रावण मुंदे (४०) याला दारव्हा पोलिसांनी अटक केली आहे. गं.भा. जया छगन दहिलेकर (४२) रा.भाडशिवनी पो.स्टे. कारंजा शहर असे मृत महिलेचे नाव आहे. हातोला येथील पवन मनोहर सळेदार यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात वनविभागाच्या जंगली झुडपात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची फिर्याद २ नोव्हेंबर रोजी दिली होती. त्यावरून पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा नोंदविला. मृताची ओळख पटविणे हे पहिले आव्हान पोलिसांपुढे होते. एसडीपीओ उदयसिंह चंदेल व ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी या तपासासाठी तीन वेगवेगळी पथके गठित केली. एपीआय अमोल सांगळे यांनी हातोला व परिसरातील गावांमध्ये कुणी महिला बेपत्ता आहे का, याचा शोध घेतला. तेव्हा जया दहिलेकर ही महिला भाडशिवनी येथून कामानिमित्त कारंजा येथे गेली होती. मात्र त्यानंतर घरी परतली नाही, अशी फिर्याद कारंजा शहर पोलीस ठाण्यात नाेंदविली गेल्याचे आढळून आले. त्याआधारे तिच्या नातेवाईकांना सोबत घेवून मृतदेहाचे वर्णन विचारले असता अर्धवट जळालेला मृतदेह जयाचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरविली असता राजू मुंदे याचे नाव पुढे आले. त्याला अटक केली. तेव्हा या क्लिष्ट गुन्ह्याची उकल झाली. एसडीपीओ उदयसिंह चंदेल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही विधवा होती. तिचे राजू मुंदे या विवाहित व्यक्तीसोबत संबंध होते. त्यातूनच त्यांच्या कुटुंबात खटके उडत. काही दिवसांपूर्वी जया त्याच्या घरी पोहोचली व गोंधळ घातला. त्यानंतर दोघांनीही पुन्हा भेटायचे नाही, असे ठरले. लाॅकडाऊन काळात त्यांच्या भेटी झाल्या नाही. मात्र नंतर पुन्हा भेटीगाठी वाढल्या. दरम्यान, जयाने राजूकडे पैशांसाठी तगादा लावल्याचे सांगितले जाते. त्यातूनच त्याने जयाचा काटा काढला असावा, असा कयास पोलीस वर्तवित आहे. अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना अवघ्या १२ तासात दारव्हा पोलिसांनी उघडकीस आणला. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. के.एस. धारणे यांनी दारव्हा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यात एपीआय अमोल सांगळे, प्रवीण लिंगाडे, फाैजदार ज्ञानेश्वर धाेत्रे, ठाणेदारांचे रायटर सुरेश राठोड, जमादार श्रावण दाढे, अशोक चव्हाण, पोलीस अंमलदार श्याम मेहसरे, सुनील राठोड, आरिफ शेख, मोहसीन चव्हाण, प्रेमानंद खंडारे, किरण राठोड, शब्बीर पप्पूवाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.