मुंबई - अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली वांद्रे पोलिसांसमोर देशद्रोहाच्या प्रकरणात आपले जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि बहिणीला वांद्रे पोलीस चौकशीसाठी अनेकदा बोलावले. मात्र, कायदेशीर पळवाटा शोधून त्या तारखा टाळण्यात आल्या होत्या. अखेर आज कंगना आणि तिच्या बहिणीला वांद्रे पोलीस ठाण्यात जाणे भागच पडलं आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली होती. त्यावेळी ती हिमाचल प्रदेश येथे आपल्या मूळगावी होती. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली होती. या दोघींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
गेल्या वर्षी १७ ऑक्टोबरला कंगनाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली होती. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.