नाशिक : नेपाळचा मूळ रहिवासी असलेला व सध्या निफाड तालुक्यातील माडसांगवी येथे गुरखा म्हणून राहणारा 21 वर्षीय युवक हिरालाल प्रजापती याचा आठवडाभरपूर्वी मध्यरात्री लाकडी दांड्याने मारहाण करुन दहीपुलावर खून करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दहीपूल भागात खुनाची घटना घडली होता. पोलिसांनी तपासला गती देत या भागातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयावरून पिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (२७, रा. गंगाघाट, मुळ सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) यास गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. मयत हिरालाल प्रजापती (२१, रा. मडसांगवी) याने खरे याच्या मुलीची छेड काढल्याची कुरापत काढून लाकडी दांड्याने हल्ला चढवून ठार मारल्याची कबुली दिली आहे.
पथकाने त्यास गंगा घाटावरील दुतोंड्या मारूतीजवळून ताब्यात घेतले. मयत प्रजापती हा गंगाघाट येथे आला असता, त्याने आपल्या मुलीची छेड काढल्यचा खरे यास संशय आला. मद्यपी खरे याने लाकडी दंडुका घेत त्याचा पाठलाग सुरु केला. प्रजापती याला दहीपुलावर एकटे गाठून लाकडी दांड्याने मारहाण करुन पलायन केले होते. दरम्यान, पाठलाग करण्यासाठी खरे याने एक दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेलतल्याचे समोर येत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली अजय शिंदे, सहायक निरिक्षक सचिन खैरणार, महेश कुलकर्णी आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत अखेर उलगडा केला. भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना याचे धागेदोरे मिळवून संशयिताला बेड्या ठोकण्यास मात्र वाघ यांच्या पथकाला यश आले.