नांदेड : दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर गुरूवारी राज्यातील १७५ पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची यादी जारी करण्यात आली आहे. या निरीक्षकांना आता पाेलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त बनविण्यात आले आहे. सुमारे वर्षभरापासून या निरीक्षकांना पदाेन्नतीच्या या यादीची प्रतिक्षा हाेती. महसुली संवर्ग मागून तीन महिने लाेटल्यानंतरही यादी जारी हाेत नसल्याने या निरीक्षकांमध्ये अस्वस्थतता पाहायला मिळत हाेती.
या यादीच्या प्रतिक्षेत अनेक निरीक्षक सेवानिवृत्तही झाले. तिच वेळ आपल्यावर तर येणार नाही ना याची हुरहूर या निरीक्षकांना हाेती. पदाेन्नतीची ही यादी मंजूरीसाठी निवडणूक आयाेगाकडे पाठविली गेली हाेती. त्यामुळे विलंब झाल्याचे सांगितले जाते. अखेर यादी जारी झाल्याने निरीक्षकांमधील हुरहूर थांबली आहे. या यादीतील काही अधिकारी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त हाेणार आहेत. त्यामुळे त्यांना ही बढती अवघी महिनाभरासाठी मिळणार आहे. जून अखेर राज्यातील ३५० पेक्षा अधिक पाेलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त हाेणार असल्याचे सांगण्यात आले.अवघ्या दीड तासांची बढती३० नाेव्हेंबरला सेवानिवृत्त हाेत आहेत म्हणून नवी मुंबई पाेलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विकास रामगुडे यांना मंगळवारी उपअधीक्षकपदी बढती दिली गेली. मात्र ती अवघ्या दीड तासाची ठरली. कारण रामगुडे यांना सायंकाळी ६.३० ला पदाेन्नतीचा आदेश मिळाला. मुंबईत नियंत्रण कक्षात रात्री १०.३० ते उपअधीक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर दीड तासाने रात्री १२ वाजता सेवानिवृत्त झाले. या औट घटकेच्या पदाेन्नतीची पाेलीस दलात चर्चा आहे.