नवी दिल्लीहेरगिरीच्या आरोपाखाली देशाच्या अर्थ मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पैशांच्या बदल्यात संबंधित कर्मचारी देशाच्या अर्थ मंत्रालयाशी निगडीत महत्वाची माहिती इतर देशांना पुरवत होता. आरोपीचं नाव सुमित असं असून तो अर्थ मंत्रालयात कंत्राटी पद्धतीवर काम करत होता. पण तो आपल्या कामकाजाच्या दरम्यान सीक्रेट माहिती इतर देशांना पुरवत होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारत होता अशी माहिती समोर आली आहे.
सुमितकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार याच फोनच्या माध्यमातून तो हेरगिरी करत होता. याप्रकरणी ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आता सुमित नेमका किती वर्षांपासून अर्थ मंत्रालयासाठी काम करत होता आणि नेमकी कोणत्या प्रकारची माहिती इतर देशांना पुरवत होता याबद्दलची कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. अर्थ मंत्रालयाशी निगडीत प्रकरण असल्यामुळे पोलिसांनीही सविस्तर चौकशीनंतरच आपलं स्टेटमेंट जारी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ऑफिशयल सीक्रेट अॅक्ट १९२३ सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांवर लागू होता. या कायद्याअंतर्गत जो व्यक्ती हेरगिरीच्या प्रकरणात सामील असतो किंवा देशद्रोहासारख्या कृत्यांमध्ये सहभागी असतो आणि अशांकडून देशाच्या अस्मितेला धोका पोहोचत असेल अशांविरोधात कारवाई केली जाते.