नवी दिल्ली : भारतात सायबर गुन्हे (Cyber Crime) आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud) घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आता ऑनलाइन लोकांची शिकार करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. नुकतेच दिल्ली येथील एम्सच्या (Delhi Aiims) एका निवासी डॉक्टरांसोबत असे एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये क्रेडिट कार्डची (Credit Card) मर्यादा वाढवण्याच्या कॉल आल्यानंतर डॉक्टराच्या खात्यातून 2 लाख रुपये उडवण्यात आले. एवढेच नाही तर या कालावधीत ना ओटीपी (OTP) विचारला गेला ना इतर कोणतीही माहिती विचारली गेली.
या संदर्भात निवासी डॉक्टरानी दिल्लीतील साकेतच्या सायबर पोलिस सेलकडे तक्रारही केली आहे. यासोबतच अॅक्सिस बँकेलाही या घटनेची माहिती देणारा अर्ज केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना अॅक्सिस बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक IVR पोर्टल 9650611697 वरून कॉल आला. ज्यामध्ये क्रेडिट कार्डची मर्यादा (Credit Card shopping Limit) वाढवण्याची ऑफर दिली. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची बाबही संशयास्पद वाटली नाही, कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी याच प्रक्रियेतून आपल्या कार्डची मर्यादा वाढवली होती. त्यामुळे फोन करणाऱ्याचे म्हणणे त्यांनी मान्य केले.
डॉक्टरानी सांगितले की, कॉल करणाऱ्या व्यक्तीने क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही माहिती आपल्यासोबत शेअर करू नयेत असे सांगितले आणि अॅक्सिस बँकेच्या फोन बँकिंग अॅपला भेट देऊन खरेदीची मर्यादा वाढवण्यास सांगितले. यानंतर त्याने helpcreditcard.in ही वेबसाइट ओपन करून डिटेल्स भरण्यास सांगितले. मागील वेळेप्रमाणे प्रक्रिया पुढे गेल्यावर, क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर, फोनवर एक ओटीपी आला आणि कॉलरने सांगितले की, पुढील 24 तासांत क्रेडिट कार्डची मर्यादा वाढेल. त्यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट करताच मोहम्मद इबरार इंटेरिअर यांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 2 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा मेसेज आणि ईमेल आला. हा मेसेज येताच तत्काळ अॅक्सिस बँक आणि क्रेडिट कार्ड विभागाला या फसवणुकीच्या व्यवहाराची माहिती दिली आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. बँकेकडे तक्रार देण्याबरोबरच दिल्ली पोलिसांनाही कळवले आहे.
यासंदर्भात दिल्ली पोलिसांचे सायबर क्राइम सल्लागार आणि भारतीय सायबर आर्मीचे चेअरमन किसलय चौधरी यांनी सांगितले की, दिल्ली एम्सच्या डॉक्टरासोबत जसे घडले, तसे प्रकार रोजच घडत आहेत. फसव्या व्यवहारांची प्रकरणे डेबिट कार्डवरूनच नव्हे तर क्रेडिट कार्डवरूनही समोर येत आहेत. गेल्या आठवड्यातच ऑनलाइन फसवणुकीची सुमारे 35 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात बँक खात्यातून पैसे काढण्याबरोबरच क्रेडिट कार्डचे व्यवहारही झाले आहेत. आजकाल काही वेबसाइट्स, विशेषत: परदेशी वेबसाइट्स आहेत, जिथे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे बेसिक डिटेल्स टाकल्यानंतरही फसवणूक होत आहे. यासाठी OTP किंवा CVV देखील आवश्यक नाही. दिल्ली एम्सचे प्रकरणही असेच आहे. अशा प्रकरणांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बँकेच्या नियमांचीही माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच फोन बँकिंगच्या वापरातही खबरदारी घ्यावी लागणार आहे.