बहरोड पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करून आपल्या साथीदारांसोबत फरार झालेला कुख्यात गुंड विक्रम सिंह उर्फ पपला गुर्जर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. जयपूर रेंजचे आयजी पथकाने महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून अटक केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी पपलाने तीन माजली इमारतीवरून उडी मारली. त्याला घरात आसरा देणाऱ्या गुंडाच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
डीजीपी एम. एल. लाठर यांनी सांगितले की, अटक केलेला आरोपी विक्रम सिंह उर्फ पपला गुर्जर हा हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खैरोली परिसरात राहतो. हरियाणा आणि राजस्थानमध्ये पपलाने अनेक गुन्हे केले आहेत. लाठर यांनी पुढे सांगितले की, मोस्ट वॉन्टेड पपलाने बहरोड पोलीस ठाण्यात अंदाधुद गोळीबार केला आणि दिल्लीच्या नजीकच्या एनसीआर परिसरात तो लपून होता. त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस पाच लाखाचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू
पोलिसांपासून वाचण्यासाठी पपला आपला वेष पालटत असे. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत तो वेषांतर करत असे, तसेच त्याने आपले नाव उधम सिंह ठेवले होते आणि कोल्हापूर निवासी असल्याचं बोगस आधारकार्ड बनवून राहत होता. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, पपला गुर्जरच्या चौकशीतून अजून बरेच धागेदोरे हाती लागू शकतात. बहरोडमध्ये गोळीबार केल्यानंतर तो कोणाकडे जाऊन राहिला. त्याला कोणी कोणी आसरा दिला. त्याशिवाय किती वेळ कुठे कुठे थांबला. पोलीस त्याची संपूर्ण माहिती गोळा करत होते. पोलीस याचा सुद्धा तपास करत आहेत, ज्या लोकांनी त्याला आसरा दिला, त्यांना गुंडाने पैसे तर दिले नाहीत ना.
असे सुरु होते ऑपरेशन
डीजीपी लाठर सांगितले की, एएसपी सिद्धांत शर्माने पपलाची माहिती काढताना तो त्याच्या प्रेयसीसोबत कोल्हापूरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी तिच्या घराचा व्हिडीओ बनवून जयपूरला पाठवून पपला त्या व्हिडिओत आहे कि नाही याबाबत खात्री पटवली. २६ जानेवारीला जयपूरहून २४ कमांडो कोल्हापूरला पाठवण्यात आले. २७ आणि २८ जानेवातिच्या मध्यरात्री २ वाजता पपलाच्या मुसक्या आवळण्याचे ऑपरेशन सुरु झाले. पपला ज्या मैत्रिणीच्या घरात राहत होता, तेथे जवळपास जास्त लोकसंख्या नव्हती. मैत्रीण त्याच घरात जिम देखील चालवत होती. पळ काढण्यासाठी पपलाने तेथे आपले बस्तान मांडले होते. राजस्थान पोलिसांनी त्याचे पळून जाण्याचे सर्व रस्ते घेरले होते.
ऑपरेशनदरम्यान पपला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी त्याने इमारतीवरुन उडी घेतली होती. मात्र तो टीमच्या हातातून सुटू शकला नाही व कमांडोंनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासोबत त्याच्या मैत्रिणीलाही जयपूर येथे नेले जात आहे. पपला गुर्जर प्रकरणात आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. बहरोड पोलीस ठाण्यात पपलाला हजर करण्यात येणार आहे. यावेळी सुरक्षेसाठी तब्बल 400 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोर्ट आणि मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.