लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, एका युवकाला बुलेटचा शौक महागात पडला. वाहतूक पोलिसांनी या युवकाला तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारला. नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याची वाहतूक शाखेच्या इतिहासातील ही पहिली कारवाई ठरली आहे.अंकुश कांबळे असे कारवाई करण्यात आलेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित हे मंगळवारी दुपारी गस्त घालत होते. कडबी चौक ते मंगळवारी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर बुलेटस्वार हेल्मेट न घालता राँग साईडने येताना दिसला. पंडित यांनी पाठलाग करून त्याला पकडले. वाहनाचे कागदपत्र मागितले असता त्याच्याजवळ नव्हते. बुलेटच्या मागे फॅन्सी नंबर प्लेट आढळली. वाहतूक पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या विविध १४ कलमानुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करून १० हजार ३०० रुपये दंड आकारला. ही रक्कम अधिक असल्यामुळे अंकुश दंडाची रक्कम जमा करू शकला नाही. त्यामुळे इंदोरा वाहतूक पोलिसांनी त्याची बुलेट जप्त केली. वेगाने बुलेट व मोटारसायकल चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नियमांचा भंग करणाºया बुलेटस्वारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिला आहे.
फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराला १० हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 9:24 PM
फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, एका युवकाला बुलेटचा शौक महागात पडला. वाहतूक पोलिसांनी या युवकाला तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारला.
ठळक मुद्देनागपूर वाहतूक पोलिसांची कारवाई