मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलविरुद्ध विनापरवाना रुग्णालय सुरू ठेवून जादा बिलाची आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याबद्दल महापालिकेने गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोग्याधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी याबाबत गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिरजेतील अपेक्स कोविड हाॅस्पिटलच्या तक्रारीबाबत आरोग्याधिकाऱ्यांच्या पथकाने आठवड्यापूर्वी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली होती. अपेक्स रुग्णालयात उपचाराबाबत रुग्णांच्या तक्रारींमुळे महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध करून रुग्णालय बंद करण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र त्यानंतरही रुग्णालय सुरूच ठेवल्याने व रुग्णालयात जादा बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारीमुळे महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. आंबोळे यांनी रुग्णालयावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी रुग्णालय बंद करण्याच्या आयुक्तांच्या आदेशानंतरही नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. आंबोळे अपेक्स केअर रुग्णालयाचे चालक डाॅ. महेश जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. विनापरवाना रुग्णालय चालविले व न केलेल्या उपचाराची बिले घेणे, जादा बिल आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत रुग्णांची फसवणूक व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.