लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध (FIR Against rhea chakraborty) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे चार जणांचे पथक मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहे. यावरून रिया आणि मुंबई पोलीस ट्विटरवर सारखे ट्रेंड होत होते.
सुशांतच्या वडिलांनी सुरुवातीपासून रियाकडेच कसून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी तिचा जबाबही नोंदविला. या प्रकारानंतर संशयाच्या घेऱ्यात असलेल्या रियाने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली.रिया कनेक्शन शोधण्यासाठी सोमवारी महेश भट्ट यांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही सर्व आरोप फेटाळले. अशात सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार, रियाने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांची मागणी केली. त्याने पैशांची मागणी पूर्ण न केल्याने रियाने त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यातूनच त्याने आत्महत्या केली, त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शिवाय, रियाने त्याच्या खात्यातून १७ कोटी रुपये काढल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच चित्रपटसृष्टीतील काही मंडळीनाही सुशांतच्या आत्महत्येस जबाबदार धरले आहे. त्यानुसार पाटणा पोलीस अधिक तपास करीत आहे.होऊ शकते अटकरियाने सुशांतच्या पैशांचा वापर स्वत:च्या ड्रीम प्रोजेक्टसाठी केला. यात भावालाही सहभागी करून घेतले, असाही आरोप तिच्यावर आहे. याप्रकरणी रियाला कधीही अटक होऊ शकते.या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद..३४०,३४२, ४२०, ४०६, ३०६, १२०(ब) कलमानुसार रियासह तिच्या कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबरोबरच फसवणुकीच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राजीव नगर पोलीस ठाण्यात शनिवारी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.धर्मा प्रोडक्शनच्या अपूर्वा मेहताचा जबाब नोंदवलामंगळवारी दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांची अंबोली पोलीस ठाण्यात तीन तास चौकशी करण्यात आली. ‘ड्राइव्ह’ चित्रपटादरम्यान धर्मा प्रोडक्शनसोबत सुशांतचा वाद झाला होता? अशी माहिती सुशांतच्या व्यवस्थापकाच्या चौकशीतून समोर आले होते. याबाबतच मेहता यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनीही सर्व आरोप फेटाळले आहेत.