औरंगाबाद : निर्मात्याच्या परवानगीशिवाय आणि प्रदर्शित होण्यापूर्वी संपूर्ण सिनेमा यू ट्यूब या समाजमाध्यमावर टाकल्याप्रकरणी यू ट्यूब व्यवस्थापक आणि एका जणावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
समीर मनोज वेती आणि यू ट्यूब व्यवस्थापकाचा आरोपीमध्ये समावेश आहे. याविषयी मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक उद्धव जाधव म्हणाले की, एन-२ सिडको येथील मच्छिंद्र चाटे यांच्या देवयानी मुव्हीज कंपनीनिर्मित ‘मनेका उर्वशी’ हा चित्रपट त्यांनी मार्च महिन्यात मुंबईत प्रदशर््िात केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे, असे असताना आरोपी समीर मनोज वेती याने निर्मात्याची परवानगी न घेता हा संपूर्ण चित्रपट मूळ प्रमाणपत्रासह यू ट्यूब या समाजमाध्यमावर ५ जून रोजी अपलोड केला.
ही बाब निर्माते चाटे यांना समजताच त्यांनी २ आॅगस्ट रोजी यू ट्यूबला ई-मेलद्वारे ही माहिती देऊन बेकायदेशीररीत्या चित्रपट प्रदर्शित करू नये, असे कळविले. यानंतर कार्यवाही न झाल्याने चाटे यांनी टेक डाऊन ही नोटीस पाठवून कॉपीराईटचे उल्लंघन झाल्याचे कळविले. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या मालकीहक्काबाबतची कागदपत्रेही यू ट्यूब व्यवस्थापनास पाठविली. तरीसुद्धा हा चित्रपट आजही यू ट्यूबवर उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर यू ट्यूबने चाटे यांचे यू ट्यूबवरील अकाऊंट बंद करून टाकले. परिणामी, यात तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. याविषयी चाटे मुकुुंदवाडी ठाण्यात फिर्याद नोंदविली.