गुना : मध्य प्रदेशच्या गुना लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले भाजपाचे खासदार कृष्णपाल यादव यांच्या संकटांत वाढ झाली आहे. कृष्णपाल यादव आणि त्यांच्या मुलाविरोधात मध्य प्रदेशच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी त्यांनी दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
लोसकभा निवडणुकीत यादव यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. कृष्णपाल हे कधी काळी शिंदे यांचेच खास होते. राजकारणाचे धडेही त्यांनी शिंदे यांच्याकडूनच गिरवले होते.
यादव यांनी आरक्षणाचा लाभ उठविण्यासाठी त्यांचे उत्पन्न क्रिमिलेयर (8 लाख रुपये प्रतिवर्ष) पेक्षा कमी दाखविली होती. हे प्रकरण 2014 मधील आहे. यादव यांनी त्यांच्या मुलाला आरक्षणचा लाभ देण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचा आरोप आहे. तर लोकसभा निवडणुकीत यादव यांनी त्यांचे उत्पन्न 39 लाख असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. या दोनेही उत्पन्नांमध्ये कमालीचा फरक असल्याने काँग्रेसच्या आमदाराने याची तक्रार केली होती. यानंतर यादव यांच्या मुलाचे प्रमाणपत्रच रद्द करण्यात आले होते.