गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - घुसखोर बांग्लादेशी महिलेला अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट बनवून देण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर यांनी तक्रार देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या एसीपी असलेले दिपक फटांगरे आणि तत्कालीन सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप असून याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) ने मालवणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार कुरुळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी महिला आरोपी रेश्मा खान हिने अनधिकृतरीत्या व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून अन्य साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून भारताचा पासपोर्ट तयार केला. त्याप्रकरणी कुरुळकर यांनी तक्रार देऊनही आरोपी फटांगरे आणि भारती यांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार दाखल न करण्यासाठी कुरुळकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक ( सीआययु ) चे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सीआययु याप्रकरणी अधीक तपास करत आहे.
दरम्यान याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३६/२०२१ हा भारतीय दंडविधान संहिता कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२० आणि ३४ तसेच कलम १२ (१-अ) (अ) आणि (ब) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ सह नियम क्रमांक ३,६ पारपत्र(भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) १९५०, सह कलम ३ पारपत्रान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम १९२० सह कलम ३(१) विदेशी नागरीकाबाबतचा अध्यादेश १९४८ सह कलम १३,१४ (अ) (ब) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम १९४६ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.