नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांचा आकडा 3,42,46,157 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,348 नवे रुग्ण आढळून आहेत तर 805 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,57,191 लोकांना जीव गमवावा लागला आहे. विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे. काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे.
खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्याचं बिल लावलं आहे. याप्रकरणी उपचारादरम्यान हलगर्जीपणा, फसवणुकीसारखे अन्य गंभीर आरोप महिलेने केले आहेत. रामा मेडिकल कॉलेजच्या एमडीसह 13 जणां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये पतीचा मृत्यू हा 25 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता झाला आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सकाळी 11.30 वाजता घेण्यात आलं ब्लड सँपल
रुग्णालयाने दिलेल्या अन्य कागदपत्रांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सकाळी 11.30 वाजता ब्लड सँपल घेण्यात आलं. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत. आनंद बाग येथे राहणाऱ्या गीता तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी त्यांचे पती आनंद शंकर तिवारी यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रामा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. व्हिडीओ कॉलवर त्याचं पतीसोबत बोलणं होत होतं.
रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून आनंद यांच्या पत्नीला बसला धक्का
पतीने रुग्णालयात सुरू असलेला गैरव्यवहार आणि डॉक्टरांनी आपली सोन्याची चेन घेतल्याची माहिती पत्नीला व्हिडीओ कॉलवर दिली. त्यानंतर रुग्णालयाने त्यांचा फोन जप्त केला. 24 एप्रिलला मेडिकल बुलेटिनमध्ये आनंद यांच्या तब्येत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून आनंद यांच्या पत्नीला धक्काच बसला. त्यामध्ये मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या ब्लड सँपलचा देखील उल्लेख होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.