मीरा रोड - निवडणुकीच्या प्रचारा साठी देशाच्या सैन्यदलाचा वापर करणे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या चांगलेच अंगलट आले आहे. परवानगी नसताना जाहिरात केल्या प्रकरणी आचार संहिता भंगाचा मेहतांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांच्या फेसबुक वर २६ एप्रिल रोजी दुपारी वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदनच्या छायाचित्र व नावाचा वापर करुन निवडणुक जाहिरात पोस्ट केली होती. जाहिरातीत, ज्यांनी देशाचा मुलगा अभिनंदन याला ४८ तासात याला ४८ तासात परत भारतात आणले त्यांना आता साथ देणार नाही तर कधी देणार ? अशा प्रकारची वाक्य टाकुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, विंग कमांडर अभिनंदन आणि स्वत:चे छायाचित्र मेहतांनी टाकले होते. मेहतांनी सदर जाहिरात सोशल मिडीयावर टाकताना ठाण्याच्या जिल्हा मॉनिटरींग समितीची मंजुरी सुध्दा घेतली नव्हती. समितीच्या सदर प्रकार निदर्शनास आला होता. या प्रकरणी २७ एप्रिल रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा महाविद्यालयीन विद्यार्थी कृष्णा गुप्ता यांनी केंद्रिय निवडणुक आयोगासह राज्य निवडणुक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रार केली होती.संरक्षण मंत्रालयाच्या सुचने नंतर निवडणुक आयोगाने प्रचारासाठी देशाच्या सैन्यदलाचा वा सैनिकाचा वापर करण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत आ. मेहतांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र व नाव प्रचारासाठी वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा गुपता यांनी प्रशासना कडे पाठपुरावा चालवला होता. दरम्यान अतिरीक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पुजारी यांनी आचार संहिता भरारी पथकातील लिपीक गणेश कदम यांना आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास प्राधिकृत केले.त्या अनुषंगाने कदम यांन रविवारी भार्इंदर पोलीस ठाण्यात भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा. दं. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आणखी सबळ कलमं लावली गेली नाहीत. सैन्य दलाच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या बलिदानाचा आपल्या घाणेरड्या राजकिय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांना देशभक्त जनता माफ करणार नाही असं सांगत या विरोधात सैन्य दलासह संरक्षण मंत्रालयास तक्रार करणार असल्याचे गुप्ता म्हणालेया आधी २०१२ सालकच्या पालिका निवडणुकीत मेहतां विरोधात विशिष्ट मतांसाठी पाळीव प्राणी कपतानाचे दाखवून मतदानासाठी आव्हान केल्याची सीडी वाटप प्रकरणी भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु ठाणे न्यायालयातुन ते सुटले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेहतांनी जाती -धर्मावर आधारीत प्रचार एका गुजराती वृत्तपत्रातुन केल्या प्रकरणी पेड न्युज मध्ये त्यांना दोषी ठरवत शुल्क भरुन घेण्यात आले. पण अन्य तक्रारी प्रकरणी ठाणे जिल्हा कार्यालयातुन काहीच कारवाई झाली नव्हती.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु होताच कामाचे भुमिपुजन केल्याची तक्रार झाली असता पालिका प्रशासनाने दिशाभुल करणारा अहवाल देत मेहतांची पाठराखण केली. तर मुर्धा गावातील जाहिरात फलक प्रकरणी सबळ पुराव्यांसह तक्रार करुन देखील गुन्हा दाखल करण्यात आला नसल्या बदद्दल गुप्ता यांनी संताप व्यक्त केला. पालिका आयुक्त व प्रशासन मेहतांना नेहमीच संरक्षण देत आल्याने त्या अधिकारायांवर कारवाईची मागणी गुप्ता यांनी केली आहे. तर दाखल गुन्ह्याचा तपास काटेकोर होण्यासाठी वरिष्ठांनी जातीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.