विजय मांडे
कर्जत - अभिनेत्री कंगना राणौत हिने नुकतीच एका वृत्तवाहिनी वरील कार्यक्रमात प्रकट मुलाखत दिली. सदर मुलाखतीमध्ये कंगना राणौत हिने आक्षेपार्ह वक्तव्य करून स्वतंत्र सैनिकांचा अपमान केला आहे. तिच्या विरोधात एफआयआर दाखल करावी, अशा मागणीचे निवेदन कर्जत तालुका काँग्रेसच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले.
अभिनेत्री कंगना राणौत हिने नुकतीच एका वृत्तवाहिनी वरील एक कार्यक्रमात प्रकट मुलाखत दिली. सदर मुलाखतीमध्ये कंगना राणौत हिने देशाच्या स्वातंत्र्या लढ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून असंख्य स्वातंत्र सैनिकांचा जाहिर अपमान केला आहे.
कंगनाने देशाला 1947 साली स्वातंत्र मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाल खरे स्वातंत्र 2014 साली मिळाले, असे विधान करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. सदर वक्तव्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असुन समाजात संतापाची लाट उसळली आहे. इतकेच नाही तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गाधी यांच्या बद्दलही आक्षेपार्ह विधान केले आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. तरी कंगना राणौत हिच्यावर कायदा १९८५ अंतर्गत तात्काळ एफआयआर दाखल करून योग्यती कार्यवाही करण्या यावी याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना दिले. याप्रसंगी माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, सुभाष मदन, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.