नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात असलेल्या गुंठेवारी विभागाला गुरुवारी मध्यरात्री 12.15 वाजता अचानक आग लागली. यात गुंठेवारीच्या अनेक संचिका जाळून खाक झाल्या आहेत. यावेळी काही वातानुकुलीत यंत्राचे वायरही जळाल्या आहेत.
आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. आगीने संपूर्ण बचत भवन आपल्या कवेत घेतले असते, अशी माहिती अग्निशमनविभागाचे शेख रईस पाशा यांनी लोकमतला दिली.
घटनास्थळी उपजिल्हाधिकारी पठाण यांनी भेट देऊन आगीची पाहणी केली. या आगीमागील कारण स्पष्ट नाही, मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून शहरात गुंठेवारिच्या संचिकांचा घोटाळा, त्यावरील अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या याचा विषय गाजत आहे. या घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या आगीच्या घटनेची सखोल चौकशी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या आगीमुळे गुंठेवारीचा वादग्रस्त विषय आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.