कर्नाटक - INS विक्रमादित्य युद्धनौकेला आग लागली असून या आगीत एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कारवारमध्ये घडली आहे. जखमी नौदल अधिकारी ले. कमांडर डी. एस. चौहान यांना आयएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका असून तिचं वजन ४० हजार टन आहे. उंची ६० मीटर असून लांबी २८४ मीटर इतकी आहे. या युद्धनौकेला २० मजले असून सर्वात मोठी आणि जड अशी युद्धनौका आहे. या युद्धनौकेला लागलेल्या आगीचं कारण अद्याप कळू शकलेले नाही. कारवार येथील नौदल तळावर जात असताना INS विक्रमादित्यला ही आग लागली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. यामध्ये ले. कमांडर डी.एस.चौहान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीनंतर नौदलाने त्वरीत चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे चौकशीअंती आगीचं नेमकं कारण स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.