अलीगढ : उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या नेत्याच्या भावावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला आणि फरार झाले. या गोळीबारात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अलीगढमधील आरएसएसचे मेरठ प्रांताचे प्रचारक धनीराम सिंह यांच्या मोठ्या भावावर हा हल्ला झाला आहे. सुग्रीव यांच्यावर समेना ततारपुर गावात ही घटना घडली. याच गावात धनीराम राहतात. तर त्यांचे भाऊ सुग्रीव (60) हे डॉक्टर आहेत. शेतात पाणी देण्यावरून काही लोकांशी सुग्रीव यांचा वाद झाला होता.
रात्री शेतात पाणी लावून सुग्रीव हे घरी जात असताना त्यांना पाच लोकांनी घेरले आणि गोळीबार केला. यावेळी सुग्रीव यांनी आरडाओरडा केला, तसेच गोळ्यांचा आवाज ऐकून गावातील लोक घटनास्थळी धावत आले. त्यांना पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. गावकऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही चौकशी सुरु केली आहे.
सुग्रीव यांच्यावर गोळीबार होणे हा जुन्या वादातून झालेली घटना समजली जात आहे. काही दिवसांपूर्वी शेतात पाणी लावण्यावरून काही लोकांशी त्यांचा वाद झाला होता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संघ प्रचारकाच्या भावावर गोळीबार झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी रवाना झाला. या घटनेनंतर संघाचे आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. पोलिसांनी रात्रीच अटकसत्र आणि छापे मारण्यास सुरुवात केली.