नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (दि.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली. नाशिकरोड बाजूकडून डीजीपी नगरमार्गे जाणाऱ्या बाबा वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारात त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोर वडाळागावाच्या दिशेने पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान या हल्लेखोरांनी दहशत माजविण्यासाठी पुन्हा डिजीपीनगरच्या जॉगिंग ट्रॅकलगतच्या गतिरोधकाच्या परिसरात हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. दोन दुचाकींवरून हल्लेखोर हातात गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्नात होते.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपआयुक्त विजय खरात, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या बाबाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. काही हल्लेखोरांनी ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याच परिसरात महापौर सतीश कुलकर्णी यांचेही निवास्थान आहे. डिजीपीनगर ही सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाची सर्वात जुनी गृहनिर्माण वसाहत म्हणून ओळखली जाते.