अंबरनाथ : अंबरनाथच्या एमआयडीसी चौकात रविवारी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून ३२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि मुख्य आरोपी पंढरीनाथ फडके यांचा त्यात समावेश आहे. गुन्हा दाखल होताच शिवाजीनगर पोलिसांनी फडके आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली.पनवेलचे फडके आणि त्यांच्या समर्थकांनी हा गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा असून राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष फडके यांच्यासह एकूण ३२ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरलगोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी अशा गोळीबाराच्या घटना घडू लागल्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तरी किमान बंदी घालावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.