राजुरा (चंद्रपूर) राजुरातील सोमनाथपूर वॉर्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (२७) यांचा मृत्यू झाला असून, शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. कोळसा तस्करीतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
रात्री उशिरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. लल्ली शेरगिल हेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रात्री चंद्रपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्यासह बाहेर गेले होते. पूर्वाशा यांचा नाहक जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हकनाक गेला जीव
लल्ली शेरगिल हे सचिन डोहे यांच्या घराशेजारीच राहत असून, गोळीबार करणाऱ्याने त्यांचा पाठलाग केल्याने जीव वाचविण्यासाठी ते डोहे यांच्या घरात शिरले. पाठलाग करणाऱ्याने गोळीबार केला त्याचवेळी पूर्वाशा घराबाहेर आल्याने त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना राजुरा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाशा डोहे यांना मृत घोषित केले.