नागपूर - गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपींमध्ये गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान एका टोळीने दुसऱ्यावर गोळीबार करण्यात झाले. नेम चुकला म्हणून गोळी पायावर लागल्याने मोहसिन खान (वय २६) नामक तरुण बचावला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी भल्या सकाळी ही थरारक घटना घडली. पिस्तुलातून गोळी झाडून मोहसिनची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पाच आरोपींचा समावेश आहे. त्यातील मुशिफ आणि अल्ताफ मिर्झा ही दोन नावे उघड झाली आहे.
जखमी मोहसिन आणि गोळीबार करणारे आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यात वर्षभरापासून वर्चस्वाचा वाद आहे. दोघेही ट्रान्सपोर्टिंगमध्ये आहेत. त्यामुळे व्यावसायिक वादाचीही किनार या गोळीबाराला आहे. गेल्या वर्षी मोहसिनच्या मित्रांनी आरोपींशी संबंधित गलगोट्या नामक तरुणावर गोळी झाडली होती. त्यात तो बचावला होता. या प्रकरणी तहसील ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. तेव्हापासून वैमनस्य अधिकच वाढले होते. काही दिवसांपूर्वी आरोपी मुशिफच्या कारची काच फोडण्यात आली होती. ती मोहसिनच्या साथीदारांनीच फोडली असावी, असा संशय आल्यामुळे आरोपी अधिकच पेटले होते. त्यांनी मोहसिनचा गेम करण्याची तयारी केली होती. त्यानुसार, दोन दिवसांपासून ते त्याच्या पाळतीवर होते.
मोहसिन त्याच्या काही मित्रांसोबत रविवारी ताजबागमध्ये गेला होता. ते कळाल्यापासून आरोपींनी त्याचा स्पॉट लावण्याची तयारी केली. सोमवारी भल्या सकाळी ५.३० वाजता मोहसिन ताजबागमधून घराकडे निघाला. गितांजली चाैकात आरोपी मुशिफ, अल्ताफ आणि त्यांचे तीन साथीदार इको स्पोर्ट कारमध्ये दबा धरून बसले होते. टप्प्यात येताच मुशिफ आणि अल्ताफ कारमधून उतरले आणि या दोघांनी मोहसिनवर गोळी झाडली. ती त्याच्या पायाला लागल्याने तो खाली पडला. सकाळची वेळ असली तरी मॉर्निंग वॉकला तसेच नाश्ता करण्यासाठी निघालेल्यांची गीतांजली चाैकात बऱ्यापैकी गर्दी होती. गोळीबार झाल्याचे लक्षात आल्याने एकच आरडाओरड झाली. त्यामुळे आरोपी कारमध्ये बसून पळून गेले. माहिती कळताच गणेशपेठ, तहसील पोलिसांचा ताफा तिकडे धावला. तोपर्यंत मोहसिनच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात पोहचवले होते.
आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना
उपचार झाल्यानंतर तहसील पोलिसांनी मोहसिनची जबाबवजा तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपी मुशिफ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही मोहसिनकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली.
आरोपींचा पाठलाग अन् फोनोएकूणच घटनाक्रम बघता या प्रकरणात पाच पेक्षा जास्त आरोपी असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला. ताजबागमधून निघाल्यापासून आरोपींच्या साथीदारांनी मोहसिनचा पाठलाग केला असावा. त्याची धावती माहिती गीतांजली चाैकात असलेल्या मुशिफ, अल्ताफ आणि साथीदारांना मोबाईलवर दिली असावी, असा संशय आहे.