नवी दिल्ली : अक्षरधाम मंदिरासमोर चार अज्ञातांनी पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार केला. हल्लेखोर कारमधून आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असता हल्लेखोर गीता कॉलनीच्या दिशेने पळून गेले.
दिल्ली पूर्वचे डीसीपी जसमीत सिंह यांनी सांगितले की, पोलिसांचे पथकाने गीता कॉलनीच्या फ्लाय ओव्हरपर्यंत हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र, ते फऱारी होण्यास यशस्वी झाले. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहोत. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने आले होते. कमी किंमतीत कॅब सर्व्हिस देत ते प्रवाशांना लुटत होते.
गोळीबारात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. दिल्ली पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून लुबाडण्याच्या तक्रारी मिळत होत्या. यामुळे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी जाळे टाकले होते. मात्र, त्यांना संशय आल्याने पोलिसांवरच गोळीबार करण्यात आला. दिल्लीमध्ये दर दिवशी पोलिसांशी चकमक झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अक्षरधामसारख्या मंदिरात दिवासाढवळ्या असा प्रकार घडल्याने राजधानीतच लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.