- शिवाजी पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर येथील कुख्यात संतोष एकनाथ वायकर याच्यावर त्याच्या जुन्या सहकार्याने गोळीबार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचे नाव विष्णू रामदास लाड असे आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी लाड व वायकर हे दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. शनिवारी शहरातील बेलापूर रस्त्यावरील कमानीजवळ ही गोळीबारीची घटना घडली. वायकर टोळीचा प्रमुख संतोष हा आपल्या कारमधून घराबाहेर निघाला असता लाड याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी कारच्या काचेला लागून गेली. त्यानंतर लाड हा मोटारसायकलवरून फरार झाला.
तत्पूर्वी शुक्रवारी भाऊसाहेब गंगावणे याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी लाड हा तेथे आला. पोलिसांना खबर दिल्यामुळे नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला, असा आरोप त्याने माझ्यावर केला, असे वायकर याचे म्हणणे आहे. आरोपी लाड, त्याची पत्नी राणी, भाऊ शंकर, नातेवाईक गणेश बिरदवडे तेथे आले व माझ्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे आईला शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले, अशी माहिती वायकर याने फिर्यादीत दिली आहे.
दरम्यान, वायकर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नगर येथील कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तेथे गुन्हा दाखल असून पोलिस त्याचा शोध घेत होते. लाड व वायकर दोघेही एकत्र गुन्हेगारी टोळीत सक्रिय होते. पोलिस असल्याची बतावणी करून त्यांनी गुन्हे केले आहेत, अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी जीवन बोरसे यांनी दिली.