नवी दिल्ली - दिल्लीतील मॉडल टाऊन येथे एका तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या तरुणाने काही दिवसांपूर्वी एका दुसऱ्या धर्माच्या (मुस्लीम) मुलीसोबत लग्न केले होते. यामुळे मुलीचे नातलग नाराज होते, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा ऑनर किलिंगचा प्रयत्न असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Firing on the young man in Delhi)
यासंदर्भात, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास, मॉडेल टाऊनजवळ एक तरुण गोळी लागल्याने जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चौकशीत 26 वर्षीय पीडित देवा आदर्श नगर येथील रहिवासी असल्याचे समजते. तो इतर दोघांसोबत मोटारसायकलवरून आला होता. यानंतर, त्याच्या मागे बसलेल्या दोघांनी त्याच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलासारख्या हत्याराने गोळी झाडली आणि पळून गेले.
याप्रकरणी, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर घटनेच्या 6 तासांत प्रकरण सोडविण्यात आले. आरोपी शाहनवाज आणि हर्षित या दोघांचे वय 20-21 वर्षे आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि पीडित तरुणाची एनफिल्ड बुलेट जप्त करण्यात आली आहे. शाहनवाज हा पीडित तरुणाच्या पत्नीचा भाऊ असून हर्षित हा शाहनवाजचा मित्र आहे. दोघांनीही हल्ल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.