उल्हासनगर - कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाखाली सोमवारी रात्री साडेनऊ वाजता जुन्या रागातून भरत उर्फ सोन्या लष्कर याच्यावर दुचाकीवरून आलेल्यांनी गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भरतचा मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली.
कॅम्प नं-४ येथील पालिकेच्या जलकुंभाखाली भरत काही मित्रांसमावेत गप्पा मारत होते. त्यानंतर सर्वजण घरी जाण्यास निघाले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अभिजित उर्फ कलर, कृष्णा कुंभार, सलीम व उदय भाटकर असे चार जण तेथे आले. त्यांनी भरत याला जुन्या भांडणाचा जाब विचारत होते. त्या वेळी सलीम याने पिस्तूल काढून भरतच्या डोक्यात गोळी झाडली. तसेच गळयावर धारदार शस्त्रांनी वार करून पळ काढला. भरत याच्या डोक्यात गोळी लागल्याने व गळा चिरल्याने तो रक्ताच्या थारोळयात पडला. मित्रांनी त्याला रूग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे तीनच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विठ्ठलवाडी पोलिसांसह सहायक पोलीस आयुक्त डी. डी. टेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करून फरार झालेल्या चौघांच्यामागे पोलीस पाठवून उदय भाटकर व कृष्णा कुंभार यांना काही तासात अटक केली. दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती भामे यांनी दिली. महापालिकेच्या बंद पडलेल्या विविध सरकारी इमारती हे गुन्हेगारीचे अड्डे बनले आहेत.