पुणे - पुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या एकाला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव समीर ऐनपुरे (वय - २६) असं आहे. पोलीस तपासात आरोपीचे नाव शुक्राचार्य मदाळे हे असल्याचं उघड झाले असून आरोपी आणि जखमी तरुण एकाच परिसरात राहतात. प्राथमिक माहितीनुसार आरोपी शुक्राचार्यची टपरीवर महापालिकेने कारवाई केली होती. आरोपीला वाटले जखमीनेच पालिकेकडे तक्रार केली, या संशयावरून गोळीबर करण्यात आला. जखमीची प्रकृती स्थिर असून त्याच्या डोक्याला गोळी चाटून गेली. जखमीचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे.
समीर हा सेनापती बापट रोडवरून पुणे विद्यापीठ चौकात येत होता. सिग्नल लागल्याने तो तेथे थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्याजवळ जाऊन एक राऊंड झाडत गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर तात्कळ पाषाणच्या दिशेने पळून गेला. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. विद्यापीठ चौकात सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असते. अशावेळी गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अज्ञात आरोपीचा तपास पोलीस करत असून अदयाप या हल्ल्यामागील कारण अस्पष्ट आहे. स्थानिक पोलिसांनी विद्यापीठ चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची पथके रवाना केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गोळीबारासाठी कुठली बंदूक वापरली याचा पोलीस शोध घेत आहेत.