मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांना तीन महिन्यांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे. वेळेत टॅक्स न भरल्याप्रकरणी बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने नाडियादवालांना शिक्षा सुनावली आहे.
८. ५६ लाख रुपये जमा करण्यास एक वर्षाचा विलंब केल्याप्रकरणी फिरोज नाडियादवालांना तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. २००९ - २०१० या आर्थिक वर्षात कर भरण्यास नाडियादवालांनी दिरंगाई केली होती.उशिराने रक्कम भरल्याने गुन्हेगारी दायित्व कमी होत नाही, असं बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने म्हटलं आहे. २००९ - २०१० या वर्षात व्यवसाय कमी झाल्यामुळे कर भरण्यास उशीर झाल्याचं नाडियादवाला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये चित्रपट निर्मिती केली नाही, मात्र जुन्या चित्रपटांच्या विक्रीमुळे आपलं उत्पन्न स्थिर राहिलं होतं. परंतु टीडीएस भरण्यास उशीर झाला असा नाडियादवाला यांनी कोर्टात दावा केला. मात्र हा दावा कोर्टाने फेटाळून लावला आहे. मार्च २०१४ मध्ये एका आयकर अधिकाऱ्याने फिरोज नाडियादवालांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दिलेल्या वेळेत टॅक्स न भरल्याचं योग्य कारण नाडियादवाला देऊ शकले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी वेलकम, वेलकम बॅक, फिर हेराफेरी, हेराफेरी 3, दिवाने हुए पागल, आवारा पागल दिवाना, आन यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.