हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या आई-वडिलांच्या घरी नाताराम येथे छतावरील पंख्याला दोरी बांधून आपले जीवन संपवले. सना पटेल असं मृत्यु झालेल्या तरुणीचे नाव असून तिने पती हेमंत पटेल याच्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे फेसबुक लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली, मात्र शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचा पती हेमंत सध्या सायप्रस देशात असून एका संगीत शिक्षकासह डीजेही चालवतो. हेमंतचे इतर कोणासोबत संबंध होते, त्याच वादातून सनाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खटला दाखल केला असून चौकशीला सुरुवात केली आहे.
सनाने फेसबुक लाईव्हमध्ये पती हेमंतवर आरोप केले आहेत. तसेच, तिच्या ३ वर्षीय मुलाचा ताबा हेमंतकडे न देता तिच्या आई-वडिलांकडे देण्यात यावा, अशी मागणीही केलीय. सनाच्या कुटुंबीयांनी केलेल्या फिर्यादीवरुन हेमंत पटेल आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ४९८ A नुसारही गुन्हा दाखल केला आहे.
सनाच्या आईने सांगितले की, रात्री उशिरा मी मुलीच्या बेडरुममध्ये गेली असता तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. सनाने ५ वर्षांपूर्वी लग्न केले होते, राजस्थानचा रहिवाशी असलेल्या हेमंतसोबत तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र, हेमंतने बाहेरच्या महिलेसोबत संबंध प्रस्थापित केल्यामुळे सना आणि त्याच्यात वाद निर्माण झाला होता. मानसिकदृष्ट्या तो सनाला परेशान करत होता. लहान-सहान गोष्टींवर दोघांमध्ये भांडणं होत होती.
दरम्यान, सनाचा पती सध्या सायप्रस देशात राहत होता, तो कधी कधी सनाला फोन करायचा. गेल्या २ महिन्यांपासून त्याने सनाला फोन करणे बंद केले होते. तसेच, फोन करण्याचेही बजावला होते. मंगळवारी दोघांमध्ये फोनवरुन भांडण झाले होते.