लोकमत न्यूज नेटवर्ककानपूर : प्रियकराशी लग्न करून पतीची कोट्यवधींची मालमत्ता हडप करण्यासाठी एका महिलेने आधी सासऱ्याची आणि नंतर पतीला औषधाचा ओव्हरडोस देऊन मारल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी सासऱ्यालाही ओव्हरडोस देऊन एवढ्या सफाईने ठार मारले की कोणाला सुगावाही लागला नाही.
महिलेने पतीची हत्या करण्यासाठी प्रियकराला तीन लाखांची सुपारी दिली. या जीवघेण्या हल्ल्यात पतीचा जीव वाचला. तो ५ दिवस रुग्णालयात होता. नंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी पोहोचला. घरामध्ये पत्नीने त्याला औषधांचा ओव्हरडोस दिला. दोन दिवसांनी पतीची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. ऋषभ तिवारी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी सपना, तिचा प्रियकर राजकुमार कपूर, त्याचा मित्र सतेंद्र आणि मेडिकल स्टोअर ऑपरेटर सुरेंद्र यादव यांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पती तडफडत असताना प्रियकराशी गप्पाघटनेच्या १३ दिवसांनंतर पोलिसांनी खळबळजनक खुनाचा खुलासा केला. यामध्ये आरोपी सपना आणि तिचा प्रियकर राज कपूर गुप्ता यांचे व्हॉट्सॲप चॅट समोर आले आहे. ज्या रात्री ऋषभचा मृत्यू झाला, त्याच रात्री त्याला औषधांचा ओव्हरडोस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा ऋषभला त्रास होऊ लागला आणि त्याचा श्वास थांबला तेव्हा सपनाने तिच्या प्रियकराला व्हिडीओ कॉल केला. मग व्हॉट्सॲपवर गप्पा मारल्या.
हत्येचा प्लॅन बी तयार होता...सुपारी देऊन ऋषभला मारण्याचा प्लॅन फसताच सपनाने प्लॅन बी तयार केला. मेडिकल स्टोअर ऑपरेटर सुरेंद्र यादव हा ऋषभच्या घरातच भाड्याने राहिला होता. सपनाचे सत्येंद्रसोबतही संबंध होते. ऋषभला मधुमेह आहे याची माहिती त्याने सुरेंद्रला दिली. पतीला मारण्याच्या योजनेत त्यालाही सहभागी करून घेतले. तिने सुरेंद्रकडून औषधे घेतली आणि जखमी पतीच्या सुरू असलेल्या औषधांसोबत द्यायला सुरुवात केली.
शुगर पेशंट असतानाही ऋषभला ग्लुकोजची बाटली देण्यात आली. इतकेच नाही तर ऋषभला विषारी इंजेक्शनही देण्यात आले. यामुळे ऋषभची प्रकृती बिघडली. त्याचे अनेक अवयव निकामी झाले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षापूर्वीच सपनाचे ऋषभसोबत लग्न झाले होते.