नवी दिल्ली – डोमिनिका जेलमध्ये बंद असलेला पीएनबी(PNB Scam) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा जेलमधील पहिला फोटो व्हायरल झाला आहे. चोक्सीच्या वकिलांचा दावा आहे की, डोमिनिका जेलमध्ये मेहुल चोक्सीला बेदम मारहाण केली आहे. मेहुल चोक्सीचे जे फोटो समोर आलेत त्यामध्ये त्याच्या हातावर जखमी झालेले निशाण दिसत आहेत.
या फोटोत मेहुल चोक्सी जेलच्या आतमध्ये असल्याचं दिसत आहे. एका लोखंडी जाळीच्या आतमध्ये तो आहे. दुसऱ्या फोटोत मेहुल चोक्सीच्या हातावर मारहाणीचे निशाण दिसत आहेत. मेहुल चोक्सीच्या वकिलांचा दावा आहे की, अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं पकडण्यात आलं. त्यांना मारहाण करून डोमिनिकाला आणलं गेले. मेहुल चोक्सीला टॉर्चर केले जात असल्याचा दावा वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. ते डोमिनिकाला कसे पोहचले तोपर्यंत काहीच स्पष्ट होणार नाही. ते स्वत:च्या मर्जीनं डोमिनिकाला पोहचले नाहीत. यात नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका वकिलांनी उपस्थित केली आहे.
तसेच मेहुल चोक्सी हेदेखील एक व्यक्ती आहे. कोणतंही प्यादं नाही ज्यांना कोणीही त्यांच्या मर्जीप्रमाणे खेळवू शकेल. अँटिग्वा येथील यूनायटेड प्रोग्रेसिव पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे कौतुक करतो. अँटिग्वाने प्रत्येक नागरिकाच्या अधिकाऱ्यांचे रक्षण करायला हवं. मेहुल चोक्सी हे अँटिग्वाचे नागरीक आहेत. त्यामुळे संविधानाच्या अधिकारानुसार त्यांनाही संरक्षण मिळण्याचा अधिकार असंही वकील विजय अग्रवाल म्हणाले आहेत.
दिल्लीहून डोमिनिकाला विमान पाठवलं
२८ मे रोजी डोमिनिका डगलस चार्ल्सच्या स्थानिक एअरपोर्टवर दिल्लीहून पाठवलेलं विमान लँड झालं आहे. त्यानंतर असं सांगितलं जात आहे की, मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी हे विमान पाठवलं आहे. परंतु अधिकृतपणे कोणीही या गोष्टीची पुष्टी केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय अधिकारी डोमिनिकामधून मेहुल चोक्सीला थेट भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
२३ मे रोजी अँटिग्वामधून मेहुल चोक्सी गायब झाला
मेहुल चोक्सी अँटिग्वामधून त्याच्या घरातून २३ मे रोजी संध्याकाळी गायब झाला होता. चोक्सी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतु २६ मे रोजी डोमिनिका येथे त्याला पकडण्यात आलं. चोक्सी क्यूबाला पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्याची चर्चा होती. परंतु डोमिनिका सरकारने स्पष्ट केले की त्याला अँटिग्वाला परत सोपवणार आहे. सध्या २ जून पर्यंत डोमिनिकामध्येच मेहुल चोक्सी क्वारंटाईन राहील. त्यानंतर त्याला दुसऱ्या देशात पाठवण्याची प्रक्रीया सुरु होईल.