मनीषा म्हात्रेमुंबई : 'निकला भाऊ से टक्कर लेने.. ताऊ मामुली आदमी नही है.. उद्या रात्री दोन वाजता.. समझदारला इशारा काफी.. सीधा चीर... ..भाईला पण ऐकू द्या गुड न्यूज आत (जेल)' हे दोन स्टेटस भांडुप हत्याकांडातील आरोपींनी हत्याकांडाच्या आधी आपल्या सोशल मीडियावरील खात्यावर अपलोड केले. त्यानंतर या आरोपींनी ठरल्याप्रमाणे हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भांडुप पोलिसांकड़ून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
भांडूपमधील टोळी युद्धातून सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याची रविवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास रावते कंपाऊंड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक करुन आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. अटक आरोपींकडे आणि अभिलेखावरील काही आरोपींना ताब्यात घेऊन भांडुप पोलीस पसार आरोपी राहुल जाधव, उमेश कदम यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून आरोपींना अटक झाली तरी, येत्या काळात भांडुपमध्ये गॅंगवॉर आणखी भडकण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सूरजने कारागृहातून बाहेर पडताच आपले चायनीज सेंटर सुरु केले होते. तारखेला न्यायालयात गेला असताना भांडुपमधील एका भाईसोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी सूरजने त्याला थेट एकट्याने समोरासमोर भीडण्याची धमकी दिल्याचे समजते.
सूरज नेपाळी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी आदित्य क्षीरसागर उर्फ शिऱ्याचा खास पन्टर होता. शिऱ्या हा एका भाईसोबत हत्याकांडात सहभागी होता. त्यानंतर तो भाईपासून वेगळा झाला. पुढे शिऱ्या आणि सागर जाधव उर्फ सागऱ्या यांनी स्वतंत्र टोळी तयार करुन खासदाराचा राजाश्रय घेतला. पुढे शिऱ्या हा सागऱ्यापासून वेगळा झाला असून भांडुप टेम्भीपाडा येथील एका झोपडपट्टी दादासोबत वावरत असल्याची माहिती मिळते आहे.
सूरज नेपाळी याची हत्या सुभाष भांडे टोळीने केली. एका बड्या भाईच्या इशाऱ्यावरुन ही हत्या घडवून आणल्याची जोरदार चर्चा सध्या भांडुपमध्ये रंगली आहे. यातूनच गुन्हेगारी टोळ्या याचा फायदा उठवण्याची आणि बदला घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये गॅंगवॉर आणखी भडकण्याची शक्यता आहे. पोलीस म्हणे नेमके कारण अस्पष्ट..भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पाहिजे आरोपीसोबत असलेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पाहिजे आरोपीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.