जयपूर:भारतात बलात्कार पीडितांना न्याय मिळण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु जयपूर कोर्टाने एका बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला फक्त 9 दिवसांच्या आत सर्व कारवाई करत शिक्षा देऊन एक मोठं उदाहरण देशासमोर ठेवलं आहे. 26 सप्टेंबर रोजी जयपूरच्या कोटखवडा परिसरात 9 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या 13 तासांच्या आत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी 24 तासांत आरोपींविरोधात न्यायालयात चालानही सादर केलं. यानंतर 4 दिवसांत एकूण 28 तासांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला.
या घटनेतील पीडित मुलगी अजूनही जयपूरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. कोर्टात येऊन साक्ष देण्यासारखी पीडितेची अवस्था नव्हती, त्यामुळे न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीडितेची साक्ष नोंदवली. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायालयात तो क्षण आला जेव्हा न्यायाधीशांनी आरोपीला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
देशातील ही पहिलीच घटनादेशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, ज्या बलात्काराच्या चार दिवसांच्या सुनावणीनंतर आरोपीला पाचव्या दिवशीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यात मुख्य भूमिका दक्षिण जिल्हा, POCSO कोर्ट, विशेष सरकारी वकील, FSL टीम, डॉक्टर आणि जयपूर पोलीस आयुक्तालयातील तपास यंत्रणांच्या 150 पोलिसांनी बजावली आहे.
26 सप्टेंबर रोजी झाला बलात्कार
26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता आजोबांसाठी बीडी खरेदी करण्यासाठी पीडित मुलगी घराबाहेर पडली होती. त्याचवेळी गावातील 25 वर्षीय कमलेश मीना याने मुलीला फूस लावली आणि तिला घरापासून दूर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडू लागली तेव्हा त्याने मुलीचा गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला, यात मुलगी बेशुद्ध पडली. मुलगी मृत झाल्याचा विचार करुन आरोपी तिथून पळून गेला. शुद्धीवर आल्यानंतर मुलगी आपल्या घरी पोहोचली तेव्हा सर्व प्रकार समोर आला.