मुंबई : सिग्नल मोडून जाणाऱ्या कार चालकाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसाने त्याला चौकीकडे येण्यास सांगताच, त्याने पोलिसाला गाडीत बसण्यास सांगितले. पुढे, गाडी भांडूप पोलीस ठाण्याच्या दिशेने न नेता तो नवी मुंबईच्या दिशेने सुसाट निघाला. पोलिसाने वाहतूक नियंत्रण कक्षात कॉल करून मदत मागितली. भांडूपहून ऐरोलीमार्गे रंगलेल्या थराराला दिघा येथे ब्रेक लागला. सरकारी कामात अडथळा व अपहरणाच्या गुन्ह्यात भांडूप पोलिसांनी त्याला अटक केली. मुलुंड वाहतूक विभागात कार्यरत असलेले शैलेंद्र चव्हाण (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांंनी आरोपी चालक प्रणील गाडेकरवर गुन्हा दाखल झाला आहे. गाडेकर हा नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ७ मध्ये राहतो. तो चालक म्हणून काम करतो. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री टँक रोडकडून भांडूपकडे जाणारी वाहतूक थांबल्यामुळे ते वाॅर्डन सुरेश गायकवाडसोबत तेथे आले. तेव्हा एक कार चालक सिग्नल मोडून जाताना दिसला. चव्हाण यांनी त्याला अडविताच त्याने हुज्जत घातली. त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगताच चालक गाडेकरने त्यांना मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. पुढे भांडूप पोलीस स्टेशनच्या दिशेने कार न नेता, ऐरोलीमार्गे नवी मुंबईच्या दिशेने निघाला. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. तर दुसरीकडे गाडेकर हा ‘आता मी तुला दाखवतो’ म्हणत सुसाट वेगाने जात होता. ऐरोलीमार्गाने दिवा येथे पोहोचताच येथील विठ्ठल मंदिराजवळ रबाळा पोलिसांनी त्याला अडविले. तेथून त्याला रबाळा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. थोड्या वेळाने मुलुंड पोलिसांनी तेथे धाव घेत चालकाला भांडूप पोलीस ठाण्यात आणत त्याच्यावर कारवाई केली आहे. याला भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. तो दारूच्या नशेत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
कारवाईच्या रागात पोलिसाचे अपहरण करत गाडी सुसाट पळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 9:52 AM